satyaupasak

मुंबईत राजकीय हालचालींना वेग, संजय राऊत-शरद पवारांची 25 मिनिटांची चर्चा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली.

Sanjay Raut Meet Sharad Pawar: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली आहे. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेऊन संजय राऊत यांनी चर्चा केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचे भवितव्य काय असणार, यावरही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद, आणि नगर पंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही, असा सवाल देखील उपस्थित होत आहे. दरम्यान, अशातच संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर महाविकास आघाडीत असंतोषाची ठिणगी पडली आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर टोला लगावला. यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली.

कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो

“नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचे आहेच. जे काही होईल ते होईल. आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी,” असे संजय राऊत म्हणाले.

त्यांच्या या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *